पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; न्यायालयाकडून संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी
बांदा,दि.२८ सप्टेंबर
बांदा दशक्रोशी परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या काही महिन्यांपासून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी जयदेव विठ्ठल म्हाडगूत याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीचे दुकान असून, त्याने अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावून आत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुलगी दुकानात आली नसल्याने संशयित आरोपी तिला बोलावण्यासाठी तिच्या घरी गेला. त्यावेळी मुलगी घाबरली. त्यानंतर तिने धाडस करून घडलेली हकीगत आपल्या आईला सांगितली. यानंतर तिच्या आईने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी जयदेव विठ्ठल म्हाडगूत याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.