बांदा : गणेशोत्सवासाठी बांद्यात वाहतूक नियोजनाचा कृती आराखडा

शेअर करा


बांदा,दि.२४ ऑगस्ट


आगामी गणेशोत्सव, गोपाळकाला व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत, उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी बांदा पोलिस ठाण्यात संयुक्त नियोजन बैठक झाली. सावंतवाडीचे नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक कोंडी, पार्किंग, वन-वे, माटोळी बाजार, बॅरिकेडिंग, सीसीटीव्ही आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली.
गोवा सीमेलगतची प्रमुख बाजारपेठ असल्याने गणेशोत्सव काळात ३० ते ४० गावांसह गोव्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी बांद्यात येतात. त्यामुळे वन-वे व पार्किंगचे डिजिटल नियोजन करून ते चौकाचौकांत प्रसिद्ध करण्याचे ठरले. गोव्यातून येणारी वाहने श्री बांदेश्वर मंदिरमार्गे आळवाडी मैदानावर पार्क करण्याचे नियोजन करण्यात आले असून, खेमराज हायस्कूलचे मैदानही पार्किंगसाठी उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा झाली. आळवाडी येथून वाहने कट्टा कॉर्नरमार्गे महामार्गावर आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी होणाऱ्या माटोळी बाजारासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रेत्यांना जागा देण्याची सूचना करण्यात आली. कट्टा कॉर्नरवरील बॅरिकेड्स पुढे बोंद्रे यांच्या दुकानाजवळ हलविण्याची सूचना करण्यात आली. गांधी चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची तसेच बंद सीसीटीव्ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची मागणी झाली. मालवाहू वाहनांसाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात येणार आहे.

बैठकीस बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती शीतल राऊळ, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, अरुणा सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संदेश पावसकर, मोहल्ला समितीचे आसिफ शेख, शांतता समितीचे सुशांत पांगम, प्रसाद वाळके, शैलेश केसरकर, उदय येडवे, सर्वेश गोवेकर, रियाज खान, निखिल कदम, विठ्ठल वाळके, जुबेर शेख, मंगलदास साळगावकर, अस्लम खतीब, शहीद शेख, सुनील माजगावकर, सचिन वीर, साहिल खान, दिलवान शेख, कुतूबुद्दीन शेख, आपा कोचरेकर, निखिल मयेकर, जहूर शेख आदी उपस्थित होते. बांदा सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘बांदा शहरातील एकोप्याची परंपरा कायम ठेवत सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश भागवत यांनी केले.

शेअर करा