बांदा : मुसळधार पावसामुळे बांद्यात महामार्गावर झाडाची फांदी कोसळली; सामाजिक कार्यकर्त्यांनी १० मिनिटांत वाहतूक सुरळीत केली

शेअर करा

बांदा,दि.२९ जून

बांदा शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकासमोरील झाडाची मोठी फांदी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती डॉ. मिताली सावंत यांनी तातडीने बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच अपेक्षा नाईक यांना दिली. सरपंचांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोलकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

माहिती मिळताच हेमंत दाभोलकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत झाडाची फांदी बाजूला करण्याचे काम हाती घेतले. अवघ्या दहा मिनिटांत फांदी हटवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या वेळी हेमंत दाभोलकर यांच्यासह सुशांत ठाकूर, राजेश बांदेकर, राजन गावडे आणि शानू शेर्लेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे महामार्गावरील वाहतूक लवकर पूर्ववत झाली आणि संभाव्य मोठा वाहतूक खोळंबा टळला.

शेअर करा