Talere News:कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वामनराव महाडिक विद्यालयाचे घवघवीत यश!

शेअर करा

अनेक क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

तळेरे,दि.२९ ऑक्टोंबर

कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय,तळेरे येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.विविध वयोगटांतील धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम व तृतीय क्रमांक मिळवत आपल्या क्रीडानैपुण्याची छाप उमटवली.

१४ वर्षांखालील वयोगटात अमित बोहरा याने १०० मीटर,हर्षिता तडवी हिने २०० मीटर,आरोही पवार हिने ४०० मीटर, तर असद शेख याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.४ × १००मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षांखालील वयोगटात जानवी मालंडकर हिने ८०० मीटर,अनुष्का टक्के हिने १५०० मीटर तर चैतन्य भोवड याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.साहिल पवार याने ८०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.या वयोगटातील ४ × ४०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक मिळवला.

१९ वर्षांखालील वयोगटात प्रगती निकम हिने ३००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.तसेच क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी तृतीय क्रमांक मिळवला.यशस्वी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवी झळाळी मिळाली आहे. या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा