बांदा,दि. १९ ऑगस्ट
पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ समोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी व टेम्पोची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेर्ले येथील दुचाकीस्वार या मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या गोवा येथील एका टेम्पोची वळणावर धडक झाली. अपघातानंतर परिसरात काही काळ गर्दी झाली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली. संबंधितांनी सामोपचाराने प्रकरण मिटविले.
दरम्यान, शाळेसमोरील या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने येथे तातडीने गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात लहान मुले ये-जा करत असल्याने या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गतिरोधक उभारण्याची मागणी वारंवार करूनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सागर गावडे यांनी व्यक्त केली.