पाण्याच्या वॉलच्या आश्वासनावर फसवणुकीचा आरोप : ग्रामपंचायत प्रशासनाचा अवमान
बांदा,दि. २२ जून
पाडलोस केणीवाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनसाठी जाळी बसविण्याचे काम ग्रामस्थांनी रविवारी रोखून धरले. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेला वॉल बसविण्याचे आश्वासन देऊन पूर्वीच्या ठेकेदाराने काम पूर्ण केले, मात्र प्रत्यक्षात वॉल न बसविल्याने नागरिकांना भविष्यात पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
ग्रामपंचायतीने वॉलसंदर्भात लेखी पत्र देऊन संबंधित यंत्रणेला सूचना केल्या होत्या. मात्र त्या पत्राची दखल न घेता काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपसरपंच तथा शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी ग्रामपंचायतीच्या पत्राचा अवमान झाल्याचा आरोप करत, पाण्याच्या वॉलची व्यवस्था केल्याशिवाय काम पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली.
युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर, ‘पाण्यासाठी वॉल ठेवण्यात आला आहे,’ असे सांगून पूर्वीच्या ठेकेदाराने दिशाभूल करत काम करून घेतल्याचा आरोप केला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी उपसरपंच राजू शेटकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल, पाडलोस सोसायटी संचालक बंड्या कुबल, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.