पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही होणार संपन्न
सावंतवाडी, दि.१४ जून
सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन उद्या रविवार, दि. १४ जून रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता बॅ. नाथ पै सभागृह येथे करण्यात आले आहे. या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नारायण राणे असणार आहेत.
सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन याप्रवेळी केले जाणार आहे. यासोबतच सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळकटी देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा आणि अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही याच कार्यक्रमात पार पडणार आहे.
या भव्य सोहळ्याला आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार प्रमोद जठार, आमदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आमदार निरंजन डावखरे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा पोलीस प्रमुख मोहन दहिकर आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.