मोकाट जनावरांच्या दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; भाजपचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

शेअर करा

बेफिकीर गुरे मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन

देवगड,दि.११ जुलै

देवगड-जामसंडे शहरात मोकाट जनावरांमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांना निवेदन देऊन संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोकाट गुरांमुळे झालेल्या अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला असून, या घटनेस बेफिकीर गुरे मालक जबाबदार आहेत. यापूर्वीही नगरपंचायतीमार्फत मोकाट गुरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित बेफिकीर गुरे मालकांवर सदोष मनुष्यवधासह लागू असलेल्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्याकडे केली.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, देवगड-जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका तन्वी चांदोसकर, प्रणाली माने, बुवा तारी, रोहन खेडेकर माजी नगरसेवक योगेश चांदोसकर,प्रियंका साळसकर, भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, भाजयुमो शहराध्यक्ष दयानंद पाटील, मिलिंद माने, ज्ञानेश्वर कवळे, सुभाष धुरी, बापू जुवाटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा