प्रथमेश पराडकर व प्रशांत कोंडे यांच्या अथक प्रयत्नांनी महाकाय अजगर पकडला; नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जीवदान
देवगड,दि.११ ऑगस्ट
देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात तब्बल १४ फुटी महाकाय अजगर आढळून आल्याने भाविकांसह ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील विहिरीजवळ हा अजगर आढळून आला.
आनंदवाडी येथे रविवारी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांची लगबग सुरू होती. सोमवारी रात्री १२ वाजता विठ्ठल-रखुमाईची आरती होणार असल्याने मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
याचवेळी काही भाविकांच्या निदर्शनास मंदिरानजीक नजीक असलेल्या विहिरीजवळ महाकाय अजगर आल्याचे दिसून आले.
अजगर दिसताच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच प्रथमेश पराडकर आणि प्रशांत कोंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्तीचे प्रयत्न करत काळजीपूर्वक या महाकाय अजगराला पकडण्यात यश मिळविले.
अजगराला पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. त्यामुळे एका महाकाय वन्यजीवाला जीवदान मिळाले असून, ग्रामस्थांनी प्रथमेश पराडकर व प्रशांत कोंडे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी विकास कोयंडे, तेजस कोयंडे, दर्शन कुबल, स्वप्निल कुबल, ओम कोयंडे, सुजल कुबल, वर्णेश मुणगेकर, मितेश कोयंडे, सिद्धेश पोसम, प्रतीक पराडकर, अनिश कोयंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
