देवगड : ‘विठ्ठल… विठ्ठल…!’ च्या अखंड नामघोषात तारामुंबरीची दुसऱ्या वर्षी पायी वारी पंढरपूरच्या दिशेने रवाना

शेअर करा

गाडीची विधिवत पूजा संपन्न; शेकडो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने भक्तिमय वातावरण, ब्राह्मणदेव मंदिर परिसर नामस्मरणाने दुमदुमला

देवगड,दि.१९ जुलै

“टाळ वाजे… मृदंग वाजे… वाजे हरिची वीणा… मुखाने विठ्ठल विठ्ठल गाणा…!” या अखंड नामघोषात श्रीक्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर देवस्थानाच्या वतीने आयोजित संत सोपानकाका यांच्या पालखी परंपरेतील दुसऱ्या वर्षी पायी पंढरपूर वारी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने रवाना झाली.

वारी प्रस्थानापूर्वी ब्राह्मणदेव मंदिर येथे दिंडीच्या गाडीची विधिवत पूजा करण्यात आली. ही पूजा सूर्यकांत जोशी, देविदास परब आणि ज्ञानेश्वर खवळे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजेनंतर उपस्थित वारकऱ्यांनी “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!” असा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.

यावेळी भाऊ प्रभू, भाऊ कुबल, मिलिंद कुबल, प्रफुल गोलतकर, बापू जुवाटकर, दिनेश कांदळगावकर, तुकाराम धुरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका आणि विठ्ठल नामाच्या अखंड घोषात दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

वारकरी संप्रदायाची परंपरा जपत गेली तब्बल २ वर्षे तारामुंबरी येथून पायी वारीचे आयोजन सातत्याने केले जात आहे. भक्ती, शिस्त आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम असलेली ही वारी परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचे आणि अध्यात्मिक प्रेरणेचे केंद्र बनली आहे.

यंदाही शेकडो वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून पंढरपूरकडे पायी वारीत सहभागी होण्यासाठी वाटचाल सुरू केली असून, संपूर्ण परिसर “विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!” या अखंड जयघोषाने दुमदुमून गेला.

शेअर करा