देवगड : कुणकेश्वर किनारपट्टीवरील अवैध वाळू उपशावर कारवाई; दोन टेम्पो महसूल विभागाच्या ताब्यात

शेअर करा

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाळू वाहतूक उघडकीस; पुढील कारवाईला वेग

देवगड,दि.२० जुलै

तालुक्यातील कुणकेश्वर तळेवाडी परिसरात समुद्र किनाऱ्यावरून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पोंवर महसूल विभागाने कारवाई केली. ग्रामस्थांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही कारवाई शक्य झाली असून दोन्ही वाहने महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यात आली आहेत.

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूचा बेकायदेशीर उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित वाहनांचा पाठलाग करून ती पकडली. त्यानंतर ही वाहने महसूल विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

कुणकेश्वर परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा असून, यापूर्वीही अशा घटनांबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे वाळू चोरीचा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आला.

तलाठी ए. जी. नाईक यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा