देवगड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज!

शेअर करा

देवगडच्या आठवडी बाजारात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षकांची सकाळपासून पाहणी; वाहतूक कोंडीवर मिळवले नियंत्रण

देवगड,दि.११ सप्टेंबर

कोकणातील सर्वात मोठा आणि आनंदाचा उत्सव असलेला गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल होत असताना शुक्रवारी देवगडचा आठवडी बाजार असल्याने शहरात मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले.

शुक्रवारी सकाळपासूनच नगराध्यक्ष साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने आणि पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी आठवडी बाजार परिसरात प्रत्यक्ष मैदानात उतरून वाहतुकीचे नियोजन केले. वाहनांसाठी ठरवून दिलेल्या मार्गांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची पाहणी करण्यात आली. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत आठवडी बाजारात होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात टाळण्यात प्रशासनाला यश आले.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच आठवडी बाजार आल्याने बाजारात खरेदीसाठी नागरिकांसह मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून आलेल्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस विभागाच्या संयुक्त नियोजनामुळे परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक शाम बुवा तसेच वाहतूक पोलीस प्रवीण सावंत यांनी वाहनांच्या पार्किंग व वाहतुकीबाबत कठोर भूमिका घेतल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी तैनात राहून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरातील वळणाच्या रस्त्यांवर पांढरे पट्टे मारून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

आठवडी बाजाराच्या नियोजनासाठी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, स्वप्निल बुचडे, कुंदन घाडी, अर्चना गायकवाड, लक्ष्मण लोंढे तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.तर पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस प्रवीण सावंत, आशिष कदम, प्रतीक जाधव, प्राची सावंत, नितीन डोईफोडे, योगेश महाले यांच्यासह पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजनासाठी तैनात होते.

शेअर करा