जामसंडे आझादनगर येथील ‘उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले पार्क झाडीतून मुक्त होणार तरी कधी?’
देवगड,दि.१० सप्टेंबर
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यालगत वाढलेली झाडी-झुडपे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, दुसरीकडे जामसंडे आझादनगर येथे नगरपंचायतीमार्फत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ॲनिमल पार्कची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पार्कच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे वाढल्याने पायवाटा अक्षरशः झाडीत गडप झाल्या असून, या पार्ककडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगरपंचायतीमार्फत उभारण्यात आलेल्या या ॲनिमल पार्कमध्ये विविध प्राणी-पक्ष्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. नागरिक आणि विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकणाऱ्या या पार्कचे अद्याप लोकार्पणही झालेले नाही. गेली अनेक वर्षे हे पार्क लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना देखभालीअभावी परिसरात मोठ्या प्रमाणात गवत, वेली आणि झुडपे वाढली आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पाचे सौंदर्य झाडीत हरवले आहे.
पार्कमधील पायवाटांवर आणि प्राण्यांच्या प्रतिकृतींच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी स्पष्टपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी पायवाटांवर वेली पसरल्याने नागरिकांना चालणेही कठीण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली असताना, नगरपंचायतीच्या आवारातील हा महत्त्वाचा सार्वजनिक प्रकल्प मात्र दुर्लक्षित का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ॲनिमल पार्क उभारण्यासाठी निधी खर्च करण्यात आला; मात्र त्यानंतर त्याची नियमित देखभाल आणि स्वच्छता करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का, असा प्रश्नही शहरवासीय उपस्थित करत आहेत. लोकार्पणापूर्वीच पार्कची अशी अवस्था झाली असेल, तर लोकार्पणानंतर त्याची देखभाल कशी होणार? असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे.
त्यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ॲनिमल पार्कमधील वाढलेली झाडी-झुडपे तातडीने हटवावीत, परिसराची स्वच्छता करून पायवाटा सुस्थितीत आणाव्यात आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पार्कचे लवकरात लवकर लोकार्पण करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
लाखो रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प झाडीतच राहणार की अखेर नागरिकांसाठी खुला होणार? याकडे आता नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे देवगड-जामसंडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.