देवगड : डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जेट्टी परिसर डासमुक्त ठेवण्याचे आवाहन

शेअर करा

मच्छीमार, नौका मालक, खलाशी, मासळी विक्रेते व व्यापाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन

देवगड,दि.२६ सप्टेंबर

तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार, नौका मालक, खलाशी, मासळी विक्रेते, व्यापारी तसेच मासळी व्यवसायाशी संबंधित नागरिकांनी जेट्टी परिसर स्वच्छ व डासमुक्त ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देवगड तालुक्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून यामध्ये मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्तींचाही समावेश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा परिणाम मच्छीमार, खलाशी, कामगार, नौका मालक तसेच मासळी व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर आणि व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. त्यामुळे जेट्टी परिसर, रॅम्प, मासेमारी नौका तसेच मासळी व्यवसायाशी संबंधित ठिकाणी पाणी साचणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मासळी उतरवल्यानंतर रॅम्पवर साचणारे घाण पाणी व मासळीचे अवशेष तातडीने साफ करावेत. जेट्टी परिसरात पाणी साचले असल्यास ते त्वरित काढून टाकावे. परिसराची नियमित स्वच्छता करून आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण करावे.

मासेमारी नौकांमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची नौका मालकांनी दक्षता घ्यावी. नौकेचा तळ, इंजिन रूम तसेच विविध साहित्य ठेवण्याच्या ठिकाणी पाणी साचल्यास ते तातडीने काढून टाकावे. मासेमारीच्या जाळ्या व ताडपत्री ठेवताना त्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. जाळ्या नियमितपणे उन्हात वाळवून स्वच्छ ठेवाव्यात.

जेट्टी परिसरात पडून असलेले प्लास्टिक, फायबर, जुने टायर, पाण्याचे ड्रम, क्रेट, कंटेनर तसेच अन्य अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. रिकामे ड्रम व भांडी उलटी करून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, जेणेकरून त्यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही.

मासळी विक्रेते व व्यापाऱ्यांनी मासळीची घाण तातडीने हटवून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. मासळी विक्रीसाठी वापरण्यात येणारे क्रेट, ट्रे आणि अन्य साहित्य नियमितपणे स्वच्छ ठेवावे. जेट्टी परिसर स्वच्छ, कोरडा आणि कचरा व डासांपासून मुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.

घराभोवती किंवा कामाच्या ठिकाणी पाणी साचणाऱ्या वस्तू तातडीने हटवाव्यात. पाण्याच्या टाक्या, ड्रम व साठवणूक केलेली भांडी नियमितपणे स्वच्छ करून झाकून ठेवावीत. डासांचा दंश टाळण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत तसेच आवश्यकतेनुसार डास प्रतिबंधक उपायांचा वापर करावा.

अचानक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलटी किंवा अंगावर पुरळ येणे अशी डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. स्वतःहून औषधोपचार करू नयेत. डेंग्यू झालेल्या व्यक्तीला डासांचा दंश होणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जेट्टी परिसर स्वच्छ, कोरडा व डासमुक्त ठेवण्यासाठी मच्छीमार, नौका मालक, मासळी विक्रेते, खलाशी, कामगार आणि संबंधित नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आरोग्य आणि मासेमारी व्यवसायाच्या दृष्टीने डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी, देवगड किरण वाघमारे यांनी आवाहन केले आहे

शेअर करा