देवगडमध्ये मोकाट जनावरांच्या प्रश्नावर अखेर ठोस निर्णय; तात्पुरता कोंडवाडा उभारण्यास हिरवा कंदील

शेअर करा

विशेष सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय; जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक, शहर सुरक्षा दल आणि कायमस्वरूपी कोंडवाड्यासाठीही हालचाली

देवगड ,दि.१३ जुलै
देवगड-जामसंडे शहरातील मोकाट जनावरांच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने अखेर ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच मोकाट जनावराच्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असताना, सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मोकाट गुरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक नेमणे, न.प.च्या नेनेनगर येथील जागेत तात्पुरता कोंडवाडा उभारणे तसेच कायमस्वरूपी कोंडवाड्यासाठी प्रयत्न सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पाटील, देवगड पोलीस निरीक्षक श्याम बुवा, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोरेकर तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीत पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोरेकर यांनी नेनेनगर येथील नगरपंचायतीच्या मालकीच्या कंपाउंड वॉल असलेल्या जागेत तात्पुरता कोंडवाडा उभारण्याचा प्रस्ताव मांडला. या जागेची पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

देवगड पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी मोकाट जनावरांबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना, संबंधित प्राधिकरणाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच शहर सुरक्षा दलाच्या माध्यमातून मोकाट गुरे पकडण्याच्या मोहिमेस आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बैठकीत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी मागील साडेचार वर्षांत या विषयावर प्रभावी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला. यावर गटनेते शरद ठुकरुल यांनी या विषयावर राजकारण न करता सर्वांनी मिळून मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली.

नगरसेवक सुधीर तांबे यांनी यापूर्वी जनावरे पकडण्यासाठी एजन्सी नेमण्याचा झालेला ठराव अद्याप का अंमलात आला नाही, असा प्रश्न उपस्थित करत मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. यावेळी नगरसेविका आध्या गुमास्ते, प्रणाली माने, चंद्रकांत कावले आदींनीही विविध सूचना मांडल्या.

बैठकीत जनावरे पकडण्यासाठी मानधन तत्त्वावर दोन व्यक्तींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पकडलेली जनावरे प्रथम तात्पुरत्या कोंडवाड्यात ठेवून, नंतर गोशाळेत पाठविण्यात येणार आहेत. टेंबवली येथे कायमस्वरूपी कोंडवाडा उभारण्याचे प्रयत्न, शहर सुरक्षा दलाची स्थापना आणि जनावरे पकडण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

नगरपंचायतीच्या या निर्णयांमुळे देवगड-जामसंडे शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर लवकरच प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शेअर करा