देवगड : मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर देवगडात झळकले बॅनर; अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची रंगीत तालीम

शेअर करा

३ जुलैच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड-कुणकेश्वर मार्गावर लक्षवेधी फलक; ‘जागा निश्चित नाही’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची आठवण

देवगड,दि.०२ जुलै


देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ३ जुलै रोजी होणाऱ्या आंबा–काजू बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवगड–कुणकेश्वर मार्गालगत विविध ठिकाणी मोठे लक्षवेधी बॅनर लावण्यात आले आहेत.


या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये “अणुऊर्जा प्रकल्पाबाबत अदानी, रिलायन्ससोबत सामंजस्य करार झाले असले तरी प्रकल्पासाठी जागा निश्चित झालेली नाही,” असा दावा ठळकपणे मांडण्यात आला आहे. या माध्यमातून प्रकल्पासंदर्भातील वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


३ जुलै रोजी मीठमुंबरी-बागवाडी येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनासाठी आंबा–काजू बागायतदारांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी हे बॅनर आंदोलनाच्या जनजागृतीचा भाग असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या बॅनरमुळे देवगड तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून, ३ जुलैच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा