देवगडमध्ये बौद्ध धर्म व महापुरुषांचे बॅनर्स फाडलेअज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर करा

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी, तणावाचे वातावरण निवळले;पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेत नव्याने बॅनर करून दिल्याने परिस्थिती नियंत्रणात; समाज बांधव घेणार निषेधाची सभा

देवगड,दि.२३ ऑगस्ट

देवगड येथील वाडा-मिलिंदवाडी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच परिसरात लावण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध व ‘मिलिंदवाडी’ नामफलकाचे बॅनर्स अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या सुमारास फाडल्याची घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पांडुरंग कानोजी वाडेकर (वय ७१) यांच्या तक्रारीवरून देवगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंदवाडी येथील प्रबुद्ध विकास मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकाच्या स्तंभाच्या पाठीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांचे छायाचित्र असलेले बॅनर्स लावण्यात आले होते. तसेच बसस्टॉपच्या वरील बाजूस व विकास चव्हाण यांच्या दुकानासमोर ‘मिलिंदवाडी’ असा मजकूर असलेले बॅनर्सही लावण्यात आले होते.
२२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून २३ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने हे बॅनर्स जाणीवपूर्वक फाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पांडुरंग वाडेकर यांच्या निदर्शनास बॅनर्स फाडलेल्या अवस्थेत आले. त्यांनी तत्काळ प्रबुद्ध विकास मंडळाचे सचिव जयवंत शांताराम वाडेकर व कोषाध्यक्ष नकुल सयाजी वाडेकर यांना माहिती दिली.
यानंतर पोलीस पाटील महेंद्र मांजरेकर व सरपंच सुनील रोहिदास जाधव यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.

“बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याच्या तसेच परिसरातील शांतता भंग करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला,” असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, फाडण्यात आलेल्या बॅनर्समुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देवगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक उगलमुगले, देवगड व विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी वाडा येथे दाखल होऊन कडक बंदोबस्त लावण्यात आला. मात्र देवगड पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेत संबंधित बॅनर्स पुन्हा तयार करून दिल्याने परिस्थिती शांत करण्यास मदत झाली. तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, फाडण्यात आलेले बॅनर्स ताब्यात घेऊन आवश्यक तपासणी करण्यात आली.

वाडा आंबेडकर चौकातील मोठा बॅनर, ग्रामपंचायतीच्या वतीने पिकअप शेड येथे लावण्यात आलेला बॅनर तसेच रिक्षा स्टँडनजीक लावण्यात आलेला बॅनर फाडण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा आंबेडकरी चळवळीतील समाजबांधवांनी निषेध केला असून, या संदर्भात निषेध सभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

या घटनेनंतर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजसह अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम,डि के पडेलकर, दिलीप कदम, के एस कदम, अनिल पुरळकर, सुरभी पुरळकर, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, संतोष तळवडेकर,
, समीर शिरगावकर, सुहास मिठबावकर, सुनील जाधव, विजय कदम, रत्नदीप कांबळे, राजेश साळसकर आदी उपस्थित होते.

शेअर करा