विजयकुमार कदमः तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात शिरगांव हायस्कूलचे नेत्रदिपक यश
देवगड,दि.०७ ऑगस्ट
विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक श्रीमंती प्राप्त होणार असून २०४७ चे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी नव्या दमाच्या युवा पिढीची आहे. उच्च ध्येयाने प्रेरित झालेली क्रियाशिल आणि बुद्धिमान म्हणून युवा पिढीकडे सर्वजण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. आपल्या देशासाठी बुद्धीमतेचा व्यापक वापर करून समर्पित भावनेने होऊन नवीन काही तयार करण्याचे ध्येय व्यापक ठेवून जगाला युवाशक्तीची ताकद दाखविण्यासाठी सिद्ध राहा असे प्रतिपादन विजयकुमार कदम यांनी शिरगांव येथे केले.
देवगड तालुकास्तरीय आखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा शिरगांव हायस्कूल येथे ६ ऑगष्टला पार पडला पारितोषिक वितरण समारंभात शिरगांव हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष विजयकुमार कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी भारतीय उर्जा क्षेत्र २०४७ भवितव्य (संधी) आणि आव्हाने असा विषय होता मेळाव्यात तालुक्यातील १३ शाळा सहभागी झाल्या होत्या यात शिरगांव हायस्कूलच्या खुशी चौकेकर हीने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिकविद्यामंदीरच्या सार्थक कर्ले यांने व्दीतीय तर देवगडच्या शेठ म.ग. हायस्कूलच्या स्नेहा नागरगोजे हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्रथम व व्दीतीय क्रमांकाच्या स्पर्धकांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे. परिक्षक म्हणून सोनाली जाधव. पुजा कोकीतकर, समीर धोडरे यांनी काम पाहिले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सतीशकुमार कर्ले, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव सत्यपाल लाडगांवकर, शिरगांव हायस्कूल शाळा समिती सदस्य दिनेश साटम, मंगेश लोके, शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे, केंद्रप्रमुख बापू खरात आदी उपस्थित होते.