निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम; रात्रीच्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुढाकार
देवगड,दि.११ जुलै
देवगड-जामसंडे शहरात मोकाट जनावरांमुळे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मोकाट जनावरांच्या गळ्यात रिफ्लेक्टिव्ह बेल्ट बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भाजपचे प्रदेश चिटणीस निनाद देशपांडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ देवगड-जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात करण्यात आला. रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणारी जनावरे वाहनचालकांना दूरवरून सहज दिसावीत आणि त्यामुळे अपघात टळावेत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.
जामसंडे येथे मोकाट जनावरामुळे घडलेल्या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबरच सामाजिक स्तरावरही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याच अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमात भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, माजी नगरसेवक योगेश चांदोस्कर, भाजयुमो शहराध्यक्ष दयानंद पाटील, भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.