देवगड न्यायालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

शेअर करा

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या रॅम्पचे उद्घाटन; ADR प्रक्रियेत ज्येष्ठांचा सहभाग महत्त्वाचा – डॉ. भाई बांदकर

देवगड,दि.१५ जून

तालुका विधी सेवा समिती, देवगड आणि देवगड तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, देवगड येथे “ज्येष्ठ नागरिक सशक्तीकरण व गरिमा” तसेच पर्यायी वाद निवारण प्रणाली (ADR) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी न्यायालय परिसरात उभारण्यात आलेल्या रॅम्पचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. भाई बांदकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिवाणी न्यायाधीश श्रीकांत एस. पचंडी, देवगड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. डी. आर. गोरे, ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. भाई बांदकर, ज्येष्ठ सल्लागार सुरेश सोनटक्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ॲड. संगीता कालेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध कायदेविषयक समस्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली.
डॉ. भाई बांदकर यांनी आपल्या मनोगतात पर्यायी वाद निवारण प्रणाली (ADR) चे महत्त्व विशद करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, संयम आणि समन्वयाची भूमिका वाद मिटविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. न्यायालयातील प्रलंबित खटले कमी करण्यासाठी आणि सामंजस्याने वाद सोडविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम केवळ न्यायालयापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील विविध भागांत आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ॲड. अन्वी कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेंद्र जाधव यांनी केले. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शेअर करा