देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामे, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर चर्चा
देवगड,दि.२५ जून
देवगड-जामसंडे शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे सांगत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी कणकवली नगरपंचायतीप्रमाणे विशेष मोहीम राबवून अशा बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक मांजरेकर यांनी कणकवली नगरपंचायतीच्या कारवाईचे स्वागत करत शहरातील अनधिकृत बांधकामांसह रस्त्यावर सांडपाणी सोडणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्षा मिताली सावंत, स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, मुख्याधिकारी गौरी पाटील तसेच नगरसेवक उपस्थित होते.सभेत शहरातील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा चांगलाच गाजला.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेत नळयोजनेच्या ठेकेदाराला विना दंड मुदतवाढ देण्याच्या विषयावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच मतभेद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
नळयोजनेच्या कामासाठी मुदतवाढ देण्याचा विषय सभेसमोर आल्यानंतर स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका मागितली. मुदतवाढ देण्यास विरोध नसल्याचे सांगतानाच, विना दंड मुदतवाढ देण्याची तरतूद नियमांमध्ये आहे का, याबाबत खुलासा व्हावा, अशी त्यांनी मागणी केली. भविष्यात सभागृह किंवा सदस्य अडचणीत येऊ नयेत, यासाठी हा मुद्दा उपस्थित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी ठेकेदाराला विना दंड मुदतवाढ देण्याच्या बाजूने भूमिका घेतली. यावरून दोन्ही सभापतींमध्ये शाब्दिक वाद रंगला. चर्चेदरम्यान एकमेकांवर टीकाटिप्पणी होताच सभागृहातील वातावरण काही काळ तापले.सभागृहातील इतर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर चर्चा पुन्हा नियमितपणे सुरू झाली आणि सभेचे कामकाज पुढे चालू राहिले. या घटनेमुळे नगरपंचायतीच्या सभेत सत्ताधारी गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले.
विकासकामांच्या गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांमध्ये निष्कृष्ट दर्जाचे काम करून शासनाचा निधी वाया घालवणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार का, असा सवाल उपस्थित केला.
रस्ते अनुदान निधीतून बाजारपेठेतील उताराचा रस्ता, वळकवाडी-पाटकरवाडी तसेच बेलवाडी येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवावेत, अशी मागणी नगरसेविका प्रणाली माने, नगरसेवक शरद ठुकरुल आणि चंद्रकांत कावले यांनी केली.
जामसंडे बाजारपेठेत नळपाणी योजनेसाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाइनच्या खोदकामामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी संबंधित खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली.
शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने नगरपंचायतीच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी विविध ठिकाणी ई-व्हेईकल चार्जिंग सेंटर उभारण्यात यावीत, अशी सूचना नगरसेवक बांदेकर यांनी केली.
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या वॉटर एटीएम प्रकल्पांवर खर्च झालेल्या निधीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्या जागांवर हे प्रकल्प उभारण्यात आले त्या जागा नगरपंचायतीच्या मालकीच्या नसताना लाखो रुपयांचा खर्च का करण्यात आला, याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शहरात लावण्यात येणाऱ्या शुभेच्छा फलकांवर नगरपंचायतीचा क्यूआर कोड अनिवार्यपणे लावला जावा, अन्यथा असे फलक तत्काळ हटवावेत, अशा सूचना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. अपघातप्रवण वळणांवर जाहिरात फलक लावण्यास बंदी घालावी, अशी मागणी नगरसेविका गुमास्ते यांनी केली.
निखिल हॉटेललगत नगरपंचायतीच्या खुल्या जागेत झालेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी नितीन बांदेकर यांनी केली. तसेच त्या ठिकाणी मच्छीमार महिलांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून मच्छी विक्रीसाठी स्वतंत्र जागा विकसित करावी, अशी मागणी नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केली.
शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा करताना स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती तारी यांनी साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी एजन्सीने प्रतिकिलो तीन रुपये दराने कचरा उचलण्याची तयारी दर्शविल्याची माहिती दिली.
दहिबाव येथील उद्भवावरील पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामास मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी नगरसेवक बांदेकर यांनी कामाच्या विलंबासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगत मुदतवाढ देण्यास आमची कुठलीही आमची हरकत नसल्याचे देखील यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
तरवाडी-पिंपळपाळ ते पिंपळवाडी चव्हाटेश्वर मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मुदतवाढ देऊ नये, अशी भूमिका नगरसेविका स्वरा कावले यांनी मांडली. तर प्रभाग क्रमांक १० मधील विकासकामांना मुदतवाढ देण्याची मागणी उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी सभेत केली.