देवगड : धनगर समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

शेअर करा

देवगड तालुका धनगर समाजाचे नायब तहसीलदार विवेक शेठ यांना निवेदन

देवगड,दि.०७ सप्टेंबर

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देवगड तालुका धनगर समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.याबाबतचे निवेदन सोमवारी नायब तहसिलदार विवेक शेठ यांच्याकडे देण्यात आले.

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विविध न्याय्य व दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाज, देवगड यांच्यावतीने सोमवारी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका प्रलंबित आहे. सदर प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाची वस्तुस्थिती, ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांची प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी पूर्ण ताकदीने व गांभीर्याने प्रयत्न करावेत.तसेच धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ उपलब्ध असलेले सर्व कायदेशीर, घटनात्मक, सामाजिक व ऐतिहासिक पुरावे सर्वोच्च न्यायालयासमोर प्रभावीपणे सादर करण्यासाठी शासनाने अनुभवी व सक्षम कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करावी आणि समाजाच्या बाजूने ठोसपणे बाजू मांडावी,धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र विशेष शासकीय कायदा करण्यात यावा. सदर देवस्थानाच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करून त्याचा योग्य पद्धतीने विकास व व्यवस्थापन होण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर व्यवस्था निर्माण करावी.तसेच देवस्थानाच्या विश्वस्त मंडळामध्ये धनगर समाजाला योग्य व न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे,

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसींग लिंक या महत्त्वपूर्ण प्रकल्पास शिंगोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.यावेळी देवगड तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष संतोष साळसकर, गंगाराम कोकरे, पांडुरंग जंगले,चंद्रकांत खरात, सदाशिव कोकरे,महेश जंगले, आनंद झोरे, बाबू जंगले,दीप कोकरे,रघुनाथ बोडेकर आणि राजेंद्र बोडेकर आदी समाजबांधव उपस्थित होते.

शेअर करा