१७ प्रभागांत स्वच्छता मोहीम; १८ विसर्जन घाटांवर सुविधा, ७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था; आपत्ती व्यवस्थापन कक्षही सज्ज
देवगड,दि.१० सप्टेंबर
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत वातावरण मिळावे, यासाठी नगरपंचायतीने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत नगरपंचायतीची विशेष बैठक घेऊन विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून उत्सव काळातील आवश्यक कामांचा आढावा घेण्यात आला. मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी याबाबत माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पायवाटा, काँक्रिट रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेले शेवाळ काढण्याचे काम सुरू असून आवश्यक ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात आहे.
शहरातील १८ गणेश विसर्जन घाटांवर स्वच्छतेची कामे पूर्णत्वाकडे असून, घाटांकडे जाणारे रस्ते आणि परिसराचीही साफसफाई करण्यात येत आहे. विसर्जनावेळी निर्माल्य नदी अथवा समुद्रात टाकले जाऊ नये, यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. तसेच धोकादायक आणि संवेदनशील विसर्जनस्थळी जीवरक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद असलेले पथदिवे दुरुस्त करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात ७ ठिकाणी वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी देवगड-ब्राह्मणदेववाडी मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.
वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरण कंपनीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत गरजेनुसार आरोग्य पथके तैनात केली जाणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यालगतची धोकादायक झाडे आणि गवताची छाटणी करण्यात आली असून, रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच आवश्यक ठिकाणी भरावाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
गणेशोत्सव हा श्रद्धा आणि आनंदाचा सण असल्याने नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपंचायत प्रशासन पूर्ण क्षमतेने तयारी करत आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने न उभी करता निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत. तसेच स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणाचे नियम पाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी हरिदत्त माने तसेच नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.