१७ प्रभागांत स्वच्छता मोहीम; १८ विसर्जन घाटांवर सुविधा, ७ वाहनतळ निश्चित — आपत्ती व्यवस्थापन कक्षासह पोलीस व आरोग्य यंत्रणा सज्ज
देवगड ,दि.०७ सप्टेंबर
आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरात गणेशभक्तांना आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीने विविध उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. याबाबत ७ सप्टेंबर रोजी नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. पायवाटा, काँक्रीट रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी वाढलेले शेवाळ काढून ब्लिचिंग पावडरचा वापर करून स्वच्छता करण्यात येत आहे.
देवगड-जामसंडे शहरातील १८ गणेश विसर्जन घाटांवरही स्वच्छतेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घाटांकडे जाणारे पोहोच रस्ते, पायवाटा आणि परिसर स्वच्छ करण्यासोबतच आवश्यक ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक घाटावर नगरपंचायतीचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्र निर्माल्य कलशात जमा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. धोकादायक व संवेदनशील विसर्जनस्थळी जीवरक्षकही नियुक्त करण्यात आले आहेत.
शहरातील बंद पथदिवे दुरुस्त करून ते सुरू करण्याची कार्यवाही सुरू असून, गणेशोत्सवापूर्वी पथदिव्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात सात वाहनतळांची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले असून, देवगड-ब्राह्मणदेववाडी मार्गे एकेरी वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरजेनुसार आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, उत्सव काळातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी राज्य मार्गालगत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील धोकादायक झाडी व गवत कटाईचे काम पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीवर आवश्यकतेनुसार भराव टाकणे आणि गरज असलेल्या ठिकाणी खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि उत्साहाचा सण असल्याने या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नगरपंचायतीकडून सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने पूर्वतयारी करण्यात येत आहे.
नगरपंचायतीच्या वतीने सर्व गणेशभक्त आणि नागरिकांनी स्वच्छता राखत सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे