देवगड : नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड पंचायत समितीचे विविध समाजोपयोगी उपक्रम

शेअर करा


रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, फळवाटप व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; सभापती गणेश राणे यांची माहिती


देवगड, दि. १९ जून

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त देवगड पंचायत समितीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या रक्तसाठ्याची कमतरता जाणवत असल्याने रक्तदान शिबिराला विशेष प्राधान्य देण्यात आले असून पंचायत समिती सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात २३ जून २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्गातील सुमारे ५० जण रक्तदान करणार आहेत. वाढदिवसाचा उत्सव केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न ठेवता समाजहिताच्या उपक्रमांद्वारे साजरा करण्याचा प्रयत्न असल्याचे सभापती गणेश राणे यांनी नमूद केले आहे.
याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा वाढदिवस अर्थपूर्ण स्वरूपात साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिरात पंचायत समितीचे सर्व सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सभापती गणेश राणे आणि उपसभापती अमोल लोके यांनी केले आहे. यावेळी माजी सभापती अमोल तेली उपस्थित होते.

शेअर करा