देवगड : देवगड पोलिसांची चोरी प्रकरणात जलद कारवाई; पाच लाखांचे मंगळसूत्र हस्तगत

शेअर करा

वाडातर येथील घरफोडीचा गुन्हा उघड; संशयिताला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त

देवगड,दि. ०९ जून

देवगड तालुक्यातील वाडातर येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात देवगड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरीस गेलेले सुमारे पाच तोळे वजनाचे व पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाडातर येथील रहिवासी प्रतिभा प्रदीप चोपडेकर (वय ६८) यांनी ४ जून रोजी आपल्या घरातून अज्ञात व्यक्तीने तीन पदरी सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची तक्रार देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान फिर्यादी १ जून रोजी पहाटे कालवे व मुळे काढण्यासाठी घराबाहेर गेल्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष कदम यांनी केलेल्या तांत्रिक तपासातून वाडातर येथील सिताराम धनाजी भाबल (वय ३०) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपासात आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.


पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात आशिष कदम, गणपती गावडे, संतोष नाटेकर, प्रतिक जाधव, रविंद्र महाले आणि नितीन डोईफोडे यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

शेअर करा