स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काँक्रीट निकृष्ट, लोखंडी सळ्या गंजल्याचे निष्पन्न; रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने नवीन रुग्णालय उभारण्याची मागणी
सावंतवाडी,दि.०२ सप्टेंबर
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सद्याच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारतीतील काँक्रीटचा दर्जा अत्यंत निकृष्ट, रिइन्फोर्समेंट स्टील मोठ्या प्रमाणात गंजलेले आणि काँक्रीटची घनता आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी तातडीने नवीन इमारत उभारावी, अशी जोरदार मागणी शेतकरी नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी आज पत्रकेर परिषदेत केली
श्री केसरकर म्हणाले,सार्वजनिक बांधकाम विभागाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना अहवाल सादर केला. अवनी स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी, कोल्हापूर या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार एनडीटी तपासणीत इमारतीतील गंभीर दोष समोर आले आहेत. बाह्य भिंतींवर गळती, आरसीसी घटकांमध्ये भेगा आणि फरशीवर अनावश्यक भार वाढल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या इमारतीवर तांत्रिकदृष्ट्या अतिरिक्त मजला बांधणे पूर्णपणे अशक्य असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
इमारतीच्या संरचनेसोबतच सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयातील डिझेल जनरेटर संच आणि ऑक्सिजन सिलिंडर एकमेकांच्या अत्यंत जवळ ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, हे स्थान तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण गंभीर प्रकरणी वसंत केसरकर यांनी २ सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. रुग्णालयातील बंद स्थितीतील जनरेटर संच व ऑक्सिजन सिलिंडर सुरक्षित स्थळी हलवून मोकळ्या होणाऱ्या जागेत सक्षम ‘ट्रॉमा केअर युनिट’ सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली. गंभीर अपघातातील रुग्णांना उपचारासाठी गोवा किंवा खासगी रुग्णालयांत पळावे लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवर ही सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
इमारतीचे वॉटरप्रूफिंग, स्ट्रक्चरल रूफिंग आणि सुरक्षा व्यवस्था तातडीने सुधारावी, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. तसेच ट्रॉमा केअर युनिटच्या जागेची पाहणी, बांधकामाबाबतची सद्यस्थिती आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या हमीपत्रावर नक्की काय कार्यवाही झाली, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.