Vengurla News : वेंगुर्ल्यातील रिल्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम; पटकावले ५ हजारांचे पारितोषिक!

शेअर करा

लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’ अंतर्गत स्पर्धेचे आयोजन; युवा नेते विशाल परब यांचे प्रायोजकत्व, स्थानिक कलागुणांना मिळाले व्यासपीठ!

वेंगुर्ला,दि.०२ नोव्हेंबर (प्रथमेश गुरव) –

महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’ अंतर्गत युवा नेते विशाल परब पुरस्कृत रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून वासुदेव खडपकर यांनी प्रथम क्रमांकाचे ५००० रुपयांचे बक्षीस पटकावले.
स्पर्धेत दत्तराज कामतेकर यांनी द्वितीय ३००० चे, अनंत गावडे (मालवणी आबा) यांनी तृतीय क्रमांकाचे २०००चे बक्षीस मिळविले. तर उत्तेजनार्थ तुषार रेडकर आणि दिव्या बागायतकर यांनी १००० रुपये यांनी पटकावले.
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता कला, विचार, कौशल्य आणि कल्पकता व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. याच पार्श्वभूमीवर या रील्स स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना आपली सर्जनशीलता सादर करण्याची संधी देण्यात आली. विविध विषयांवरील आशयपूर्ण आणि कल्पक सादरीकरणातून स्पर्धकांनी आपल्या कलागुणांची झलक दाखविली.
सर्व विजेत्यांना भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, आकांक्षा परब, काजल गिरप, दिपाली अभ्यंकर, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव श्रीया परब, उपाध्यक्षा सई चव्हाण, एडिटर आरती गिरप, सदस्य रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, वैभवी दाभोलकर व हर्षदा शिरसाट आदी उपस्थित होते.

शेअर करा