Kankavli News : खारेपाटण येथे महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम स्तुत्य

शेअर करा

आमदार निलेश राणे यांचे गौरवोद्गार; खारेपाटण येथे दीपावली बाजाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली,दि.०२ नोव्हेंबर

ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम खारेपाटणमधील शिवसेना कार्यकर्ते मंगेश गुरव आणि त्यांचे सहकारी दरवर्षी सातत्याने करत आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले.

ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी, या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण एस.टी. बसस्थानकासमोरील पटांगणात दीपावली महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, देवगडचे उपसभापती अमोल लोके, जिल्हा परिषद सदस्य सूद, पंचायत समिती सदस्य बंड्या मोहरकर,युवा सेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे,शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख अशपाक हाजू, पराडकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, श्री. वायगणकर, सुहास राऊत, खारेपाटणचे माजी सरपंच रमाकांत राऊत, भाजप शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, संकेत शेट्ये, मधुकर शेठ गुरव, प्रवीण लोकरे, भाऊ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, या दीपावली महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व महिला बचतगटांचे मी अभिनंदन करतो. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कौशल्याला वाव मिळतो आणि त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. खारेपाटण गावात येणारा मुख्य रस्ता ही मोठी समस्या असून, या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण निश्चित प्रयत्न करू. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ज्या पद्धतीने विकासकामे केली आहेत, त्याच धर्तीवर खारेपाटणमध्येही विकासकामे होतील. लवकरच खारेपाटणचा विकास झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खारेपाटण गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी बंधाऱ्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. खारे आणि गोडे पाणी वेगळे राहण्यासाठी योग्य नियोजनातून बंधारा उभारण्यात यावा. या कामासाठी आवश्यक असणारा निधी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीही आमदार राणे यांनी दिली.

यावेळी संजय आंग्रे, श्री. सूद, अमोल लोके आणि रुहिता तांबे यांनी मनोगते व्यक्त करून दीपावली बाजाराला शुभेच्छा दिल्या. आमदार निलेश राणे यांनी महिला बचतगटांच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.

या दीपावली बाजारात महिला बचतगटांच्या वतीने एकूण २० आकर्षक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये दिवाळीचा फराळ, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, दिवे, मेणबत्त्या, पणत्या, रांगोळी तसेच घरगुती वापरातील विविध दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकाच छताखाली विविध वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेला हातभार लावणारा हा उपक्रम ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश गुरव यांनी केले.

शेअर करा