Sindhudurg News : कोकणपण शाबूत ठेवूनच कोकणाचा विकास व्हावा, निसर्गाचा ऱ्हास करुन नको: डॉ. महेश केळुसकर

शेअर करा

साहित्यिकांनी प्रश्न विचारायला हवेत : पहिल्या घुंगुरकाठी मराठी साहित्य संमेलनात मांडले विचार

सिंधुदुर्ग,दि.०२ नोव्हेंबर

आपल्या आसपास काय चालले आहे, याचे सजग भान ठेवून साहित्यिकांनी, कवींनी प्रश्न विचारायला हवेत. सद्या सर्वत्र जो निसर्ग, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, त्याबाबत जोरकसपणे लिहिले पाहिजे. कोकणाचा विकास कोकणपण शाबूत ठेवूनच करा, निसर्गाचा ऱ्हास करुन नको, असे परखड मत ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर यांनी कसाल येथे पहिल्या घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले.

‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ सेवाभावी संस्थेने कसाल हायस्कुलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या पहिल्या घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक रंगकर्मी श्री. श्रीनिवास नार्वेकर, कसालचे सरपंच राजन परब, प्रमुख पाहुणे कादंबरीकार प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर, स्वागताध्यक्ष अवधूत मालणकर, ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्ष डॉ. सई लळीत उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यरसिकांच्या मोठ्या उपस्थितीत सात सत्रांचे हे संमेलन खुप रंगले.

या साहित्य संमेलनातील सर्व सत्रांमध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवी, लेखक, साहित्यिक यांचा समावेश होता. संमेलनाचे उद्घाटन पारंपारिक रितीने दीपप्रज्वलनाने न करता ग्रंथपूजनाच्या आगळ्यावेगळ्या प्रकारे करण्यात आले. व्यासपीठावर एका बाजूला ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा, भगवद्गीता, संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि मराठीतील नामवंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात आली होती. या पुस्तकांचे पूजन उद्घाटक श्री. नार्वेकर आणि सर्व मान्यवरांनी केले. अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी त्यांच्या ‘अधांतर अंधारात’ या काव्यसंग्रहातील ‘हवा विकू द्या’ ही कविता सादर केली. श्री नार्वेकर यांनी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘चांदण्यातील कवडसे’ या पुस्तकातील ‘शब्दांचा छंद’ या ललित लेखातील काही अंश वाचून दाखवला आणि संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. संमेलनाच्या या वेगळ्या प्रकारच्या उद्घाटनाबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सई लळीत यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. सतीश लळीत यांच्याहस्ते सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि पिंगुळी चित्रकथी शैलीतील गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषण करताना डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, लेखकाने सतत सजग राहिले पाहिजे. सत्ता ही प्रवृत्ती असते, व्यक्ती नसते. त्यामुळे लेखकाने आपल्या सभोवताली काय चालले आहे, याची सतत नोंद घेऊन त्यावर व्यक्त झाले पाहिजे, लेखकाने आपल्या लेखनाची जोखीम आणि जबाबदारी नेहमीच स्वीकारली पाहिजे. आज हवामान बदल, निसर्ग आणि पर्यावरणाची हानी हे विषय ऐरणीवर आलेले आहेत. निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. निसर्गाचा विनाश होत असताना रानाला जागे करावे लागेल आणि स्वतःलाही जागे करावे लागेल. अनावश्यक प्रकल्प, खाणकाम यातून डोंगरांचे लचके तोडले जात आहेत. सड्यांचा विनाश होत आहे. जैवविविधतेचा प्रचंड प्रमाणात विध्वंस होतो आहे. याबद्दल साहित्यिकांनी आणि लोकांनीही बोलले पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजेत. विकासाला विरोध नाही, परंतु कोकणाचा विकास करताना त्याचे कोकणपण शाबुत ठेवणे आवश्यक आहे. श्री केळुसकर यांनी आपल्या सविस्तर भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य परंपरेचा आढावा घेतला. जिल्ह्यात साहित्यविषयक कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र आले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

उद्घाटकपदावरून बोलताना श्री. श्रीनिवास नार्वेकर म्हणाले, साहित्य, कला, संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी असावी. आजच्या काळात साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. संस्कृती म्हणजे धर्म किंवा जात असा अर्थ आज घेतला जातो. यामुळे आपण कोठे जात आहोत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या सारासार विवेकाला विशिष्ट विचारांच्या दावणीला बांधणे अयोग्य आहे. यासाठी प्रत्येकाने आपली विवेकाची आणि विचारांची पणती जागृत ठेवली पाहिजे. सर्वांनी मिळून एकत्र येऊन मतभेदांपलीकडे जाऊन साहित्य, संस्कृती याचा वारसा पुढे नेणे आवश्यक आहे. घुंगुरकाठी संस्थेने साहित्य संमेलन आयोजित करून जागल्याची भूमिका घेतली आहे. अशा प्रकारचे खूप जागले निर्माण होण्याचे गरज आहे.

संमेलनाचे प्रमुख पाहुणे कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक परंपरेचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात संतसाहित्य, आंबेडकरी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, कृषीवादी साहित्य, आधुनिक वास्तववादी साहित्य अशा प्रकारचे साहित्याचे सर्व प्रवाह मजबूत आहेत, आपल्याला मिळालेला हा मोठा वारसा आहे, परंतु आज जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ वेगवेगळ्या गटांमध्ये विभागली गेली आहे. राजकारणात जसे वेगवेगळे गट असतात, तसे साहित्य क्षेत्रातही वेगवेगळे गट झाले आहेत. साहित्यिकांच्या संस्था या स्वतंत्र कोंडाळे बनल्या आहेत. आजचा काळ अवघड आहे. सामान्य नागरिक संभ्रमावस्थेमध्ये आहे. विचारांची आणि जाणिवांची शकले झाली आहेत. अशावेळी लेखक हा लोकांचा आवाज बनला पाहिजे. लेखकाने विवेकी संवेदनशीलपणे भवतालाकडे बघण्याची गरज आहे. स्वकेंद्रितता सोडली पाहिजे. जिल्ह्यात अनेक संस्था साहित्य क्षेत्रात आपापल्या परीने काम करीत आहेत. पण काही गोष्टींसाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. लेखकाने वर्तमानाची चिकित्सा केली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरणावरणाचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर लिहिले गेले पाहिजे. कोणतीच भूमिका घ्यायची नाही, काही समजूनच घ्यायचे नाही, असे करून चालणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वागताध्यक्ष अवधूत मालणकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून या साहित्य संमेलनातून दिशादर्शक मार्गदर्शन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. सरपंच श्री. राजन परब यांनीही संमेलनाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी सिंधुदुर्ग जिल्हावासीय साहित्यिकांचे संमेलन घेण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. मोबाईल आणि सामाजिक माध्यमांच्या आजच्या जगात लोकांना समोरासमोर एकत्र आणणे, साहित्यविषयक वातावरण निर्मिती करणे आणि मोबाईल पासून लोकांना पुस्तके आणि वाचनाकडे वळविणे, या उद्देशाने हे संमेलन घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘मालवणी मुलखातील लोकसाहित्य’ यावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी लेखिका उषा परब होत्या. अजय कांडर, सदाशिव गावकर यांनी या परिसंवादात भाग घेऊन लोकसाहित्याचा जागर केला. तिसरे कथाकथनाचे सत्र लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यात वैशाली पंडित आणि भाऊसाहेब गोसावी यांनी कथावाचन केले. दशावतारातील भीष्माचार्य श्री यशवंत काका तेंडुलकर यांची मुलाखत चौथ्या सत्रात मालवणी बोलीचे डॉ. अभ्यासक बाळकृष्ण लळीत यांनी घेतली. सुमारे एक तास चाललेल्या या प्रकट मुलाखतीत श्री. तेंडुलकर यांनी विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. पाचव्या सत्रात डॉ. सई लळीत यांच्या मालवणी कवितांचा नाट्याविष्कार रंगमंचावर सादर करण्यात आला. अभिनेता निलेश पवार आणि सिद्धी वरवडेकर यांनी ‘तू इलस तेवा’ ही कविता अभिनीत केली. श्रीमती सुप्रिया प्रभूमिराशी यांनी ‘वांगड’ ही कविता सादर केली. या सत्राला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन उत्साही वातावरणात पार पडले. यात रुजारीओ पिंटो डॉ सई लळीत, विठ्ठल कदम, निलेश गावकर, कल्पना मलये यांनी सहभाग घेतला. सर्वात शेवटी खुले कवी संमेलन झाले. या कवी संमेलनात सतरा कवींनी आपापल्या कविता सादर केल्या. संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन व निवेदन अभिनेता निलेश पवार यांनी केले. या संमेलनाच्या यशासाठी ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या सदस्यांनी आणि कसाल हायस्कुलचे मुख्याध्यापक मळगावकर यांनी मोठे योगदान दिले. संमेलनस्थळी असलेल्या ग्रंथप्रदर्शनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शेअर करा