सावंतवाडी,दि.०२ सप्टेंबर
निसर्गाच्या विविध रूपांनी आणि समाजाच्या भक्तिरंगानी नटलेला श्रावण शिरोडा येथील साहित्य कट्ट्यावरही बरसला. आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ‘रंग श्रावणाचे’ या कार्यक्रमात कविता, गीते, पुराणकथा, ललित आणि धर्मग्रंथावरील भाष्य यातून श्रावण अनोख्या रितीने समरसून गेला.
शिरोडा येथील र.ग. खटखटे ग्रंथालयात संपन्न झालेला हा साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग सत्तरावा मासिक कार्यक्रम होता. साहित्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी केले .नंतर सादरीकरणाला सुरूवात झाली.
भालचंद्र दिक्षित यानी रिमझिम सरी आणि सारे काही सुंदर अशा दोन आणि विशाल उगवेकर यानी एक अशा स्वरचित कविता सादर केल्या. नम्रता राय यानी अनिल कांबळेंची श्रावण, चिन्मयी जोशी हिने श्रावण मासाच्या माहितीसह कविता, राजेश वैज यानी करू नका उपहास हे गीत, तन्वी ओटवणेकर यांनी ऐश्वर्य पाटेकर यांची असा रंगारी श्रावण ही कविता ,कमलेश अणावकर यानी शिल्पा परुळेकर यांची प्राजक्त ही कविता, भवरे मॅडम यांनी अल्फा कोकणे यांची श्रावण ही कविता,उत्कर्षा साळगावकर हिने बालकवींची श्रावणमासी ही कविता सादर केली. काव्या धानजी हिने गायनातून श्रावण सादर केला, तर नेहल मळगावकर हिने गुरू ठाकूर यांची चारोळी आणि श्रद्धा राऊळ हिने स्वरचित चारोळी सादर केली.
मनवा सोन्सुरकर हिने श्रावणी सोमवारची कहाणी सांगितली, प्रांजल आरोलकर हिने नागपंचमीचे महत्त्व सांगितलं, सरोज रेडकर यांनी श्रावण मासाची वैशिष्ट्ये सांगितली. स्नेहा जोशी यांनी रामरक्षेचे महत्त्व आणि निर्मिती याविषयी सुरेख भाष्य केले. विनय सौदागर यांनी दासबोध, योगवासिष्ठ्य, पतंजली योगदर्शन, एकनाथी भागवत, श्रीगुरुचरित्रसार, श्रीमत् भगवद्गीता आदी ग्रंथांचा परिचय करून दिला. याप्रसंगी वेद, उपनिषदे, पांडवप्रताप , हरिविजय, रामायण व महाभारत या धर्मग्रंथावरही भाष्य केले. डाॅ. श्रीराम दीक्षित यांच्या बरसती घनन घन जलधारा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम अरुण धर्णे आणि श्रीराम दीक्षित यांनी पुरस्कृत केला होता. आभार खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी मानले.