फोंडाघाट, दि.०२ सप्टेंबर
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे विद्यार्थी तक्रार निवारण समितीच्या वतीने आत्मसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रसंगावधान, धाडस तसेच संकटाच्या प्रसंगी स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्याची क्षमता निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटचे सहाय्यक शिक्षक श्री. अजिंक्य पोफळे यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे महत्त्व पटवून देताना मार्गदर्शन केले. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये शरीरसामर्थ्य, शौर्य आणि स्वसंरक्षणाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळात मल्लखांब, कुस्ती, लाठी-काठी, तलवारबाजी, धनुर्विद्या, मुष्टियुद्ध यांसारख्या पारंपरिक खेळ व युद्धकला आत्मसंरक्षणासाठी उपयोगी ठरत असत. आधुनिक काळात कराटे, ज्युडो, तायक्वांदो, किक-बॉक्सिंग, कुंग-फू यांसारख्या विविध क्रीडा व आत्मसंरक्षणाच्या पद्धती उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ शारीरिक ताकद म्हणजे आत्मसंरक्षण नव्हे, तर संकटाची चाहूल ओळखणे, प्रसंगावधान राखणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करणे हेही आत्मसंरक्षणाचे महत्त्वाचे घटक आहेत, असे श्री. पोफळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध आत्मसंरक्षण तंत्रांचे प्रात्यक्षिक करून दाखवत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी आपल्या मार्गदर्शनात आत्मसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “आपत्ती किंवा संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांतपणे परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे. त्यासाठी आत्मविश्वास आणि धाडस महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षणाचे धडे घेऊन केवळ स्वतःचेच नव्हे, तर आपल्या सोबत असलेल्या इतर व्यक्तींचेही संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रूपाली पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आत्मसंरक्षणाच्या विविध तंत्रांचे प्रात्यक्षिक उत्सुकतेने पाहिले.