जिल्ह्यातील पहिला गोवंश कोंडवाडा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
देवगड,दि.१३ ऑगस्ट
देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीत मोकाट गुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या गोवंश कोंडवाड्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. मोकाट गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच रस्त्यांवरील अपघातांचा धोका लक्षात घेऊन नगरपंचायतीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या कोंडवाड्यात आणण्यात येणाऱ्या गुरांसाठी अन्न, चारा तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार असून, गोशाळांच्या माध्यमातून गुरांची व्यवस्था करण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधित पथकाने समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या.
पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी नगरपंचायतीच्या संपूर्ण टीमचे, विशेषतः स्वच्छता सभापती बुवा तारी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोकाट गुरांच्या समस्येवर अशा पद्धतीने उपाययोजना करणारा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
मोकाट गुरांबाबत बोलताना राणे यांनी संबंधित पशुमालकांनी आपली जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. गुरे रस्त्यावर सोडल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्यास प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. संबंधित मालकांची माहिती घेऊन त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


दरम्यान, मोकाट गुरांमुळे ग्रामीण भागासह रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोकाट गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. नगरपंचायत व नगरपालिका स्तरावर अशा प्रकारचे कोंडवाडे उभारण्यासाठी प्रोत्साहन देतानाच ग्रामीण भागातील समस्येसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी हरिदत्त माने, माजी आमदार अजित गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, माजी नगरसेवक योगेश चांदोस्कर, वैभव कळंगुटकर, दयानंद पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोर्डे, अॅड. प्रसाद करंदीकर, गणपत गावकर, अॅड. सिद्धेश माणगावकर तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
