देवगड : आनंदवाडीच्या विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहाला भक्तिमय सुरुवात

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन; मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

देवगड ,दि.०९ ऑगस्ट

आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री हरिनाम सप्ताहाला रविवारी मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली. सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण आनंदवाडी गाव विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने दुमदुमून गेले असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

यावेळी भाजपचे माजी आमदार अॅड. अजित गोगटे, ज्येष्ठ नेते बाळ खडपे, प्रकाश राणे, तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, नगरसेवक संतोष तारी, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेवक व गटनेते शरद टूकरूल, नगरसेविका अॅड. प्रणाली माने, व्ही. सी. खडपकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, बापू जुवाटकर, मिलिंद माने, अॅड. सिद्धेश माणगांवकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नरेश डामरी, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते.

आषाढ वद्य ११ शके १९४८, रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘पांडुरंग हरी’ अशा जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.

यावेळी महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आनंदवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आनंदवाडी तसेच आजूबाजूच्या गावांमधून मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त दर्शनासाठी दाखल होत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विविध व्यवस्था करण्यात आली असून दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावण्यात आल्या आहेत. विविध राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरही आनंदवाडी येथे उपस्थित राहून श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत आहेत.

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आनंदवाडीतील प्रत्येक घरातून येणाऱ्या भाविकांचे आपुलकीने स्वागत करण्यात येत असून करंजीसह प्रसादाचे वाटप केले जात आहे. गावातील महिला, युवक आणि ग्रामस्थ या धार्मिक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

सप्ताहादरम्यान गावात विविध दिंड्यांचे आयोजन करण्यात येत असून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात दिंड्या मंदिराकडे मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे संपूर्ण आनंदवाडी परिसराला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम असलेल्या आनंदवाडीच्या हरिनाम सप्ताहामुळे सध्या संपूर्ण परिसर ‘विठ्ठल विठ्ठल’च्या जयघोषाने अक्षरशः दुमदुमून निघाला आहे.

शेअर करा