देवगड,दि. ०७ जुलै
देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड व दीक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या ७ जुलै २०२६ जयंतीनिमित्त ‘माझे बाबा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पालकांविषयी आदर, कृतज्ञता आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमासाठी देवगड एज्युकेशन बोर्डचे उपाध्यक्ष तथा दीक्षित फाउंडेशनचे अध्यक्ष मा. निरंजन दीक्षित यांची प्रेरणा लाभली.
यावेळी व्यासपीठावर स्थानिय समितीचे सचिव ॲड. अविनाश माणगावकर, स्थानिय समिती सदस्य मिलिंद कुबल, विलास रुमडे, स्थानिय समिती सदस्या तथा रोटरी क्लब ऑफ फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुश्री पारकर, देणगीदार राजेंद्र हिंदळेकर, स्पर्धेचे परीक्षक तथा माजी मुख्याध्यापक संजीव राऊत आणि मुख्याध्यापक प्रवीण खडपकर आदि मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्याध्यपक प्रवीण खडपकर यांनी प्रास्ताविकेतून संस्कारक्षमउपक्रमाचे महत्त्व विशद केले.
उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझे बाबा’ या विषयावर एकपात्री अभिनय स्पर्धेचे व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून वडिलांचे प्रेम, त्याग, कष्ट आणि कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी प्रभावीपणे साकारत उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचे चरणपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने कार्यक्रमाला भावनिक आणि संस्कारमय वातावरण लाभले.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून जगदीश शिंदे व अन्वी कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे पदाधिकारी विलास रुमडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अशा संस्कारक्षम उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले
एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. स्वरा राजेंद्र हिंदळेकर, द्वितीय क्रमांक प्रणव चेतन ठाकूर, तर तृतीय क्रमांक हर्षल पवार यांनी मिळविला.
‘बाबा’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत इयत्ता सातवी-आठवी गटात प्रथम कस्तुरी दीपक कांबळी, द्वितीय शतानिक दर्पण हिंदळेकर व तृतीय मोहित प्रताप खवळे यांनी यश मिळविले. इयत्ता नववी-दहावी गटात प्रथम सान्ची समीर मर्गज, द्वितीय केतकी प्रकाश आंबेरकर व तृतीय सृष्टी योगेश डोईफोडे यांनी बाजी मारली. यासर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले .
यावेळी स्पर्धेचे परीक्षक संजीव राऊत यांचा श्रीफळ व सुपारीचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे कौतुक करत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आफरीन पठाण यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर कुंभरे यांनी केले.