देवगडात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी जनजागृती !

शेअर करा

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार अधिकारींनी केले नियोजन

देवगड, दि. ४ सप्टेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची व्यापक जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या देण्यात आलेल्या सूचनेनुसार परवाना अधिकारी, देवगड श्री. किरण वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चार ठिकाणी तसेच ऑनलाइन पद्धतीने एकाच दिवशी ही मोहीम राबविण्यात आली.
तारामुंबरी येथील विठू-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आलेल्या भाविकांना व मच्छिमार बांधवांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेची माहितीपत्रके वाटप करण्यात आली तसेच सप्ताहात उपस्थित झालेल्या मच्छिमारांसाठी मोफत पाच लाख रुपयांचे विमा संरक्षणही प्रदान करण्यात आले.


यासोबतच देवगड परवाना अधिकारी कार्यालय, विजयदुर्ग बंदरे व आनंदवाडी बंदरे येथेही जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली. येथे योजनेची सविस्तर माहिती देण्याबरोबरच नौका नोंदणी, परवाने वेळेत अद्ययावत करणे याबाबत मच्छिमारांना मार्गदर्शन करण्यात आले. अनेक मच्छिमारांची विमा नोंदणीही पूर्ण करण्यात आली. सर्व उपस्थित मच्छिमारांना योजनेची माहितीपत्रके वितरित करण्यात आली.


याच दिवशी रिलायन्स फाउंडेशन व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व नागरिकांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या जनजागृतीसाठी यूट्यूब लाइव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या प्रश्नांचे समाधान परवाना अधिकारी श्री. किरण वाघमारे यांनी केले. या ऑनलाईन माहिती कार्यक्रमाचा व्हिडिओ खालील लिंकवरून पाहता येईल –

या यशस्वी जनजागृती मोहिमेसाठी रिलायन्स फाउंडेशनचे श्री. राजेश कांबळे व सहकारी तसेच मत्स्यव्यवसाय विभागाचे कर्मचारी श्री. अ. भा. दाताळ, सागर मित्र दीप्तेश कोयंडे, गौरव धुरी, समीक्षा बांधकर, सारा गांवकर, स्वप्नील कुवेसकर, सेवा कुबल, गौरी भिल्लारे, कनिष्क भिल्लारे यांच्यासह सुरक्षा रक्षक धुरत, कोयंडे, जोशी, टुकरुळ, खवले, सुंदर घाटघर आदींनी मोलाचे योगदान दिले.
मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार देवगड तालुक्यात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती थेट मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असून मच्छिमार बांधव या योजनेचा अधिकाधिक लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा