देवगड : सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून व्यवसाय वाढवा; देवगडमध्ये महिला व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा उत्साहात!

शेअर करा

देवगड,दि.२८ सप्टेंबर
व्यवसाय यशस्वीरीत्या चालवण्यासाठी व्यापाऱ्यांनी संघटित होऊन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विशेषतः सोशल मीडियाचा योग्य आणि प्रभावी वापर करून स्वतःच्या उत्पादनांचे मार्केटिंग केल्यास व्यवसायाचा विस्तार वेगाने होऊ शकतो, असे प्रतिपादन पुण्यातील ‘दे आसरा फाउंडेशन’च्या संचालिका ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले.


देवगड तालुका महिला व्यापारी संघाच्या वतीने येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी ‘दे आसरा फाउंडेशन’ने विशेष तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन पुरवले.


सरकारी योजना व भांडवल उभारणीची माहिती
कार्यक्रमादरम्यान जिल्हा उद्योग केंद्राच्या सह-संचालिका कोमला माने यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध उद्योजकता विकास योजनांची सविस्तर माहिती दिली. नवउद्योजकांसाठी भांडवल, अनुदाने आणि कर्जाच्या सोयी कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.


तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे श्रीपाद दामले यांनी कोकणातील स्थानिक फळांवर प्रक्रिया करून विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय उभारण्यावर भर दिला. या माध्यमातून जागतिक स्तरावर निर्यातक्षम उत्पादने तयार करून परदेशी बाजारपेठ कशी काबीज करता येईल, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. व्यापारी संघाच्या माध्यमातून या सर्व योजना सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी देवगडमधील कौशल्य विकास विभागाचे डॉ. भाई बांदकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कौशल्य विकासाबाबत माहिती सादर केली.


प्रमुख उपस्थितांची नोंद
या मार्गदर्शक मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, देवगड तालुका व्यापारी संघ आणि महिला व्यापारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने:

  • राजू जठार (कार्यवाह, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ)
  • प्रसाद पारकर (माजी जिल्हाध्यक्ष व महासंघ सदस्य)
  • सौ. तृप्ती पारकर (महिला सदस्य, महासंघ)
  • शैलेश कदम (अध्यक्ष, देवगड तालुका व्यापारी संघ)
  • मधुकर नलावडे (सदस्य, देवगड व्यापारी संघ)
  • सौ. प्रियंका साळसकर (अध्यक्षा, देवगड तालुका महिला व्यापारी संघ)
    या कार्यक्रमाला देवगड तालुक्यातील शेकडो महिला व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा