आधुनिक भात लागवड तंत्रज्ञान व विविध शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
देवगड,दि.३० जून
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी कृषिदिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त ग्रामपंचायत मोंड येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात आधुनिक पद्धतीने भात लागवड, कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती देवगडचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.