देवगड : जमिनीच्या वादातून बापलेकाकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

शेअर करा


कोटकामते-लिंगडाळवाडी येथील घटना; दोघांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवगड,दि. १० जून

कोटकामते – लिंगडाळवाडी येथील रवींद्र माधव खाजणवाडकर (६०) यांना जमिनीच्या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील राकेश पुंडलिक खाजणवाडकर व अमन राकेश खाजणवाडकर या बापलेकाविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र खाजणवाडकर यांचे चुलत भाऊ राकेश खाजणवाडकर व त्यांचा मुलगा अमन राकेश खाजणवाडकर याच्याशी जमिनीच्या मोजणी व मालकीच्या वादावरून मतभेद सुरू आहेत. ६ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खेकडे शोधण्यासाठी गेलेले रवींद्र खाजणवाडकर हे घरानजीकच्या पायवाटेने परतत असताना संशयित राकेश खाजणवाडकर व अमन खाजणवाडकर यांनी त्यांना अडविले. जमिनीच्या वादावरून संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच धमकी दिली. या घटनेत रवींद्र खाजणवाडकर यांच्या डाव्या खांद्याला, दंडाला तसेच उजव्या व डाव्या पायाला दुखापत झाली. त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत रवींद्र खाजणवाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शेअर करा