देवगड आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बसांचे लोकार्पण; प्रवासी सेवेला मिळणार नवे बस

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; लवकरच सिंधुदुर्गात २० मिनी बस दाखल होणार

देवगड ,दि.२६ जून

देवगड बस स्थानकाच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ मालिकेच्या पाच नव्या एसटी बसांचा समावेश करण्यात आला असून या बसांचे लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तर देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नव्याने दाखल झालेल्या बसची प्रत्यक्ष पाहणी केली. बसमध्ये चढून त्यांनी आसन व्यवस्था, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा तसेच बसची एकूण रचना याबाबत सविस्तर माहिती घेतली. ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी राज्य परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी लवकरच २० मिनी बस जिल्ह्यात दाखल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुळ,नगरसेवक निवृत्ती तारी,नगरसेवक संतोष तारी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, सुभाष धुरी, मिलिंद माने, प्रियंका साळस्कर, नगरसेविका तन्वी चांदोसकर,नगरसेविका प्रणाली माने, विभाग नियंत्रक दिलीप घोडे, यंत्र अभियंता श्री. वाघमोडे, स्थानक प्रमुख सौरभ ओंडकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या बसांच्या आगमनामुळे देवगड आगारातील बसांची कमतरता काही प्रमाणात दूर होणार असून प्रवाशांना अधिक दर्जेदार व नियमित एसटी सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा