देवगड : पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोरकर यांच्या पाठपुराव्याला यश; देवगडच्या वीज-पाणी प्रश्नावर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तातडीची बैठक

शेअर करा

जून महिन्यात तब्बल १०० वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत; आठ दिवसांत आढावा बैठक, संपूर्ण अहवाल पालकमंत्र्यांकडे सादर होणार

देवगड,दि.०२ जुलै

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत जून महिन्यात वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. जून महिन्यात सुमारे १०० वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. या गंभीर प्रश्नाची दखल घेत देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी योगेश चांदोरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला.
याची तातडीने दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओरस येथील संपर्क कार्यालयात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नगरपंचायत प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत देवगड तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्याचा पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या समस्येवर तातडीने काम सुरू करण्यात येणार असून पुढील १५ दिवसांत या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठ दिवसांत पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीचा सविस्तर अहवाल पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे

.
बैठकीस उपस्थित अधिकारी :जयंतीलाल भामरे – कार्यकारी अभियंता, कणकवली,सचिन राऊत – उपकार्यकारी अभियंता, कणकवली,सौरभकुमार वर्मा–उपकार्यकारी अभियंता, देवगड,सचिन म्हेत्रे – उपकार्यकारी अभियंता, मालवण,प्रमोद मारबते – प्रभारी उपकार्यकारी अभियंता, आचरा,ओम शिंदे – कनिष्ठ अभियंता, आचरा,तुषार गावकर – कनिष्ठ अभियंता, शाखा कार्यालय रामगड,सेजल सौंदडे – कनिष्ठ अभियंता, शाखा कार्यालय मीठबाव यावेळी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी योगेश चांदोरकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोरकर तसेच पालकमंत्री मा. ना. नितेश राणे यांचे ओएसडी मनोज भोगटे उपस्थित होते.
या बैठकीमुळे देवगड शहरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर लवकरच कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा