देवगडात माजी खासदार राजू शेट्टी यांची ज्येष्ठ आंबा बागायतदार नेते सुधीर जोशी यांना सदिच्छा भेट; अणुऊर्जा प्रकल्पविरोधी लढ्यावर चर्चा

शेअर करा

आंबा बागायतदारांचे प्रश्न, प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणि पुढील जनआंदोलनाची दिशा यावर सविस्तर मंथन

देवगड,दि.०२ जुलै

देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या विविध प्रश्नांसह प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज देवगड दौरा केला. यावेळी त्यांनी देवगडचे ज्येष्ठ आंबा बागायतदार नेते सुधीर जोशी यांची सदिच्छा भेट घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान देवगडच्या आंबा बागायतदारांसमोरील अडचणी, शेती व फळबागांवर होणारे परिणाम, तसेच प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यात आला. या विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली.
आंबा बागायतदारांचे हक्क, शेतकऱ्यांचे हित आणि देवगडच्या जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेला लढा अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्थानिकांच्या भावना आणि जनहित लक्षात घेऊन या प्रश्नावर एकजुटीने आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या भेटीमुळे आंबा बागायतदारांच्या प्रश्नांसह प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील जनआंदोलनाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेअर करा