गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसराची स्वच्छता; ग्रामस्थांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे श्रमदान
देवगड,दि.०८ सप्टेंबर
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘कचरा मुक्त सिंधुदुर्ग’ या संकल्पनेला हातभार लावत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर रोजी विजयदुर्ग चौपाटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात विजयदुर्ग चौपाटी येथे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग ग्रामपंचायतीने केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत ग्रामविकास मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी सकाळच्या सुमारास चौपाटी परिसरात स्वच्छता करत श्रमदान केले.
या स्वच्छता मोहिमेत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे गाव अध्यक्ष चंद्रकांत बिडये, मुख्य सल्लागार राजेंद्र रघुनाथ परुळेकर, कार्याध्यक्ष राजाराम सपकाळ, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व मंडळाचे सदस्य महेश बिडये, मार्गदर्शक विश्वनाथ गडकर, तसेच सदस्य जयाभाऊ डोंगरे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गणेशोत्सवात भाविक व गणेशभक्त मोठ्या संख्येने चौपाटी परिसरात येत असल्याने परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामविकास मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले.