नव्या कोंडवाड्याच्या उद्घाटनावेळी मुख्याधिकाऱ्यांना शिस्तीचा धडा; पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांचा दरारा चर्चेत
देवगड,दि.१३ ऑगस्ट
देवगड-जामसंडे शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात आलेल्या कोंडवाड्याचा शुभारंभ राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटनानंतर पालकमंत्री राणे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्याशी चर्चा केली.
यावेळी चर्चा सुरू असताना मुख्याधिकारी माने यांच्या हाताची ठेवण पाहून पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांना थेट सूचना करत शासकीय कामकाजात आवश्यक ती शिस्त आणि औपचारिकता पाळण्याचा सल्ला दिला. ‘असं चालणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुनावले.
या प्रसंगामुळे उपस्थितांचे लक्ष काही काळ पालकमंत्री आणि मुख्याधिकारी यांच्यातील चर्चेकडे लागले होते. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या हरिदत्त माने यांना पहिल्याच दिवशी पालकमंत्र्यांकडून मिळालेली ही सूचना चर्चेचा विषय ठरली.
नगरपंचायतीच्या कारभारात शिस्त, प्रशासनातील गतिमानता आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याबाबत पालकमंत्री राणे यांचा स्पष्ट दृष्टिकोन या प्रसंगातून दिसून आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. आता नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी हरिदत्त माने देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा कारभार कोणत्या पद्धतीने आणि कितपत प्रभावीपणे हाकतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पुढील काळात त्यांच्या प्रशासकीय कामगिरीचे चित्र स्पष्ट होणार आहे.