मासे टंचाईमुळे चिकन-मटणाला पसंती; सायंकाळच्या मुसळधार पावसाने उकाड्यापासून दिलासा
देवगड, दि. ७ जून
तळकोकणात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर ‘मिरग’ अर्थात मृग नक्षत्राच्या स्वागताची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा मृग नक्षत्राची सुरुवात सोमवारपासून होत असली तरी परंपरेनुसार अनेकांनी आजच ‘मिरग’ साजरा करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे तळकोकणातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
मिरगानिमित्त प्रत्येक घरात खास मांसाहारी जेवणाचा बेत आखला जात असल्याने मासे, चिकन आणि मटण खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठांकडे धाव घेतली. मात्र समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि कमी आवक झाल्याने मासे बाजारात अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नव्हते. परिणामी अनेकांनी चिकन व मटण खरेदीला पसंती दिली.
दरम्यान, सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर कोसळलेल्या पावसामुळे बाजारपेठांतील नागरिकांची काही काळ धावपळ उडाली. तरीही गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, मान्सूनच्या दमदार सुरुवातीमुळे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.