देवगड : मुसळधार पावसाचा फटका; जामसंडेतील स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांच्या घराची पडवी कोसळली

शेअर करा

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सुनंदा कावले यांची ग्रामस्थांनी तासभराच्या प्रयत्नांनंतर सुटका; उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल

देवगड,दि.३० जून

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका देवगड तालुक्यातील जामसंडे येथील पाटकरवाडी परिसराला बसला. जामसंडे नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांच्या राहत्या घराच्या पडवीलगत असलेली मातीची डेगा कोसळून पडवीचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. सततच्या पावसामुळे कावले यांच्या घरालगत असलेली मातीची डेगा अचानक कोसळून पडवीवर आली. त्यावेळी सुनंदा शांताराम कावले या घरातील स्वयंपाकघरात काम करत होत्या. अचानक पत्रा आणि त्यानंतर भिंतीचा भाग कोसळल्याने त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जवळपास एक तास अथक प्रयत्न केल्यानंतर ढिगाऱ्याखालून सुनंदा कावले यांची सुखरूप सुटका करण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र त्या अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.


या दुर्घटनेत चंद्रकांत कावले यांच्या घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पाहणी केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र यामध्ये चंद्रकांत कावले यांच्या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेअर करा