सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षानंतर विशाल मांजरेकरांनी विशेष प्रयत्नातून केली सेल्फी पॉईंटची दुरुस्ती
देवगड,दि. २३ मे
देवगडमध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात होताच दररोज मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. समुद्रकिनारे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे आणि देवगडची ओळख बनलेला ‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंट पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा सेल्फी पॉईंट अंधारात असल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
पर्यटन वाढीच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सत्ताधारी भाजप नगरसेवकांना मात्र प्रत्यक्षातील समस्यांचे काहीही सोयरसुतक नसल्याची टीका आता उघडपणे होऊ लागली आहे. पर्यटनस्थळांवरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी केला. अनेक वेळा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही.
अखेरीस पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी स्वतः पुढाकार घेत विशेष प्रयत्नातून ‘आय लव्ह देवगड’ सेल्फी पॉईंटची दुरुस्ती केली. बंद पडलेली विद्युत व्यवस्था सुरू करत हा परिसर पुन्हा प्रकाशमय करण्यात आला.
विशेष म्हणजे, ज्या कामाची जबाबदारी नगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांची होती, ते काम विरोधी पक्षाच्या नगरसेवकाला विशेष प्रयत्नातून करावे लागल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. सेल्फी पॉईंट पुन्हा उजळून निघाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी “पर्यटनाच्या नावावर केवळ घोषणा आणि प्रत्यक्षात मात्र उदासीनता” अशी चर्चा आता देवगडमध्ये रंगू लागली आहे.