‘मोती तलाव बचाव’ मंच उभारणार : माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
सावंतवाडी दि.२७ ऑक्टोबर
सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता असली तरी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध सुरू आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आपापसातील वादामुळे सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासाचा सत्यानाश होत असून, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी तात्काळ आपले वैयक्तिक मतभेद मिटवून जनतेला वेठीस धरणे थांबवावे, असा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला.
नगरपरिषदेचे कामकाज कसे चालवायचे याचे ज्ञान प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना नसल्यानेच शहरात ही परिस्थिती ओढावली आहे, असा टोला लगावताना परब म्हणाले की, विशेष सभेत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ समाधानकारक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. यावेळी उपनगराध्यक्ष ऑनलाईन पद्धतीने सभेला उपस्थित होते. जर ऑडिटर सभेत उपस्थित नव्हता, तर उपनगराध्यक्षांनी त्याच वेळी विरोध का नोंदवला नाही? ऑडिटर नसताना नगराध्यक्षांनी सभा घेतली, याचा अर्थ नगराध्यक्षांचा ऑडिटवर विश्वास आहे; परंतु उपनगराध्यक्षांचा नगराध्यक्षांवर विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षांच्या निर्णयाला सत्ताधारी गटातच किंमत उरलेली नाही आणि नगराध्यक्ष कामात कमी पडत असल्याचे उपनगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदांवरून स्पष्ट होत आहे.
नगरपरिषदेतील या गोंधळामुळे आणि वादामुळे जर पाणी योजनेचे काम बंद पडले किंवा रखडले, तर भविष्यात शहराला पाणी मिळणार नाही आणि योजनेचा खर्चही दुप्पट होईल. अशा परिस्थितीत काम पूर्ण न होता जनतेला पाणी न मिळाल्यास त्याचा जाब थेट नगराध्यक्षांना विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २८ कोटींची कामे नक्की पूर्ण झाली आहेत की नाही, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून (CO) घेतली पाहिजे. कामात भ्रष्टाचार झाला असल्यास त्याची सखोल चौकशी करून, काम पूर्ण नसतानाही बिले अदा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी उपनगराध्यक्ष यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. जर ऑडिटर गैरहजर राहणार हे ठाऊक होते, तर नगराध्यक्षांनी ती सभा तहकूब करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
’मोती तलाव बचाव’ मंचच्या माध्यमातून आंदोलन:
सावंतवाडीचा मुख्य मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक मोती तलावामध्ये सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्याबद्दल संजू परब यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या मुद्द्यावर आवाज उठवल्यानंतर नगरपरिषदेने केवळ दंडात्मक कारवाई केली असली, तर नुसती कारवाई करून सांडपाणी तलावात मिसळणे थांबणार नाही. सत्ताधाऱ्यांकडून याबाबतीत कोणतीही अपेक्षा उरलेली नाही, त्यामुळे मोती तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शहरातील नागरिकांना सोबत घेऊन “मोती तलाव बचाव” मंचची स्थापना केली जाणार आहे. आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोती तलाव स्वच्छतेसाठी व संरक्षणासाठी ठोस पावले उचलली जातील, असे परब यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला नगरसेविका शर्वरी धारगळकर, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी आणि नगरसेविका स्नेहा नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.