कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; महसूल प्रशासनाने पंचनामा करून वाहने जप्त केली
देवगड,दि. १२ जून
कुणकेश्वर समुद्रकिनारी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या दोन वाहनधारकांना स्थानिक ग्रामस्थांनी रोखले. संबंधितांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय येथून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ग – ामस्थांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा करीत दोन्ही वाहने ताब्यात घेत देवगड तहसील कार्यालय परिसरात आणली. दरम्यान, शुव वारी सकाळी पुन्हा कुणकेश्वर ग्रामस्थांनी देवगड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार एस. एस. खरात यांची भेट घेत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर वरचीवाडी परिसरातील ग्रामस्थांनी कुणकेश्वर समुद्रकिनारी सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाच्या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला. कुणकेश्वर समुद्रकिनारी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या दोन वाहनधारकांना कुणकेश्वर ग्रामस्थांनी रोखत त्यांची वाहने अडवली. घटनेच्या देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, अभय पेडणेकर, वरचीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुहास नाणेरकर, निखिल कुणकेश्वरकर, गणेश कुणकेश्वरकर, सुहास वातकर, दीपक घाडी, ओंकार घाडी, केतन साटम, अनिकेत साईम, किरण गोईम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, कुणकेश्वर सरपंच यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधितांविरोधात कठोर कारवाई झाल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर महसूल प्रशासन अधिकाऱ्यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत देवगड तहसील कार्यालय परिसरात आणली.
दरम्यान, शुक्रवार सकाळी कुणकेश्वर ग्रामस्थांनी देवगड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार एस. एस. खरात यांची भेट घेत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. वारंवार तक्रार करूनही महसूल प्रशासन याकडे का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर नायब तहसीलदार खरात म्हणाले, अवैध वाळू उपसाप्रकरणी नियमानुसार कारवाई केली जाईल. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, यासाठी प्रशासन काळजी घेईल, असे आश्वासन दिले. सदर दोन्ही वाहनांमध्ये एकूण दोन ब्रास वाळू असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना हेमंत वातकर म्हणाले, सद्यस्थितीत कुणकेश्वर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे प्रकार घडत आहेत. अवैध वाळू उपसामुळे समुद्रकिनारी विहिरीच्या आकाराचे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे किनाऱ्यालगतच्या वस्तींना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. मच्छीमारांच्या होड्या ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडलाही याचा फटका बसण्याची भीती आहे. वर्षानुवर्षे अवैध वाळू उपसाचे प्रकार सुरू असून प्रशासनाचे त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कुणकेश्वर हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. मात्र समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप आणि वाळू उपशामुळे भविष्यात पर्यटनस्थळालाच धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यातही असे प्रकार सुरू राहिले आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर ग्रामस्थांना कायदा हाती घेण्याची वेळ येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.