देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी हरिदत्त माने यांची नियुक्ती

शेअर करा

प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती; कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याची मागणी अखेर पूर्ण

देवगड,दि.०८ ऑगस्ट

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर अखेर हरिदत्त दादासाहेब माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, माने हे परीक्षा अधीन मुख्याधिकारी म्हणून नगरपंचायतीचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी सुरज कांबळे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर कणकवली येथील प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, गौरी पाटील यांना आठवड्यातून केवळ दोन वेळा नगरपंचायतीत उपस्थित राहता येत असल्याने नागरिकांची विविध कामे वेळेत पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा, यासाठी ग्रामस्थ, नगरसेवक सुधीर तांबे तसेच शहर विकास समन्वय समितीच्या माध्यमातून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने हरिदत्त माने यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाल्याने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन मुख्याधिकारी हरिदत्त माने लवकरच पदभार स्वीकारणार असल्याने नागरिकांच्या प्रलंबित कामांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

शेअर करा